बेळगाव लाईव्ह:30 वर्षांपूर्वी वृंदावन प्रभुनी बेळगावात सुरू केलेल्या हरे कृष्णा आंदोलनाने आज भव्य असे स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगाव शहर भक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळेच आजचा हा हजारोंचा जनसमुदाय श्रीकृष्ण भक्तीत न्हाउन निघाला आहे “असे विचार इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. .
बेळगाव येथील मराठा मंदिर च्या सभागृहात उभारण्यात आलेल्या विशेष व्यासपीठावर आयोजित महासत्संगामध्ये भाग घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. इस्कॉन बेळगावच्या वतीने गेल्या एक ऑगस्ट पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातीलच एक भाग म्हणून चार, पाच व सहा ऑगस्ट हे तीन दिवस राधानाथ स्वामी महाराजांनी आपल्या बेळगाव येथील वास्तव्यात विशेष मार्गदर्शन केले.
काल त्यांचा महासत्संगाचा कार्यक्रम मराठा मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला होता. हजारो स्त्री पुरुषांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या महासत्संगाची सुरुवात स्वागताने झाली. महाराजांचे मराठा मंदिरकडे आगमन होताच इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज, विजयेंद्र शर्मा, शंकरगौडा पाटील, बाळासाहेब काकतकर, शिवाजीराव हंगिरकर, अनंत लाड आणि इस्कॉनच्या शेकडो भक्तांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
नटलेल्या बालिका हातात व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. इस्कॉन चा भजन वृंद ग्रुप हरी नामाचा जय घोष करीत थांबला होता.
स्वामीजींच्या स्वागतासाठी भव्य अशी रांगोळी मराठा मंदिराच्या आवारात रेखाटण्यात आली होती .यानिमित्त पुस्तक व इतर वस्तूंचे स्टॉलची मांडण्यात आले होते. राधानाथस्वामी महाराजांचे व्यासपीठावर आगमन होताच प्रेमरस प्रभुजी यांनी प्रास्ताविक व स्वागत करून स्वामी महाराजांचा परिचय करून दिला. इस्कॉन चळवळीत 1971 ला आल्यानंतर राधानाथ स्वामीजींनी ठाण्यात इको व्हिलेज ची सुरुवात करत मुंबईत भक्ती वेदांत हॉस्पिटल ची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यानंतर राधानाथ स्वामी महाराजांनी सुमारे पावणे दोन तास आपल्या रसाळ वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. “जयश्री राधा माधव कुंजबिहारी, गोपीनाथ वल्लभ श्रीवरधारी” या भजनाने त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात केली. बेळगावकरांनी आणि खास करून भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी प्रेमाने दिलेल्या आमंत्रणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून स्वामीजीं म्हणाले की, “चैतन्य महाप्रभूंची सेवा आता बेळगावात अनेक भक्त करीत आहेत. बेळगाव ही भक्तीसाठी प्रसिद्ध नगरी आहे. चैतन्य महाप्रभू यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. ते कृष्णभक्तीत अतिशय सुंदर नृत्य करायचे आणि ते आंदोलन श्री प्रभुपाद यांनी जगभर पोहचविले.
आज जगाच्या प्रत्येक भागात इस्कॉन जवळ पोहोचलेली आहे” राधानाथ स्वामी पुढे म्हणाले की, “भगवंत नेहमी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या नावाने प्रकट होतात. ते सर्व शाश्वत व दिव्य आहेत. भगवंतांच्या नामाचा जप केल्याने आपले चित्त शुद्ध होते. भगवंत भगवद् गीतेत सांगतात की “जो माझे स्मरण करतो त्याच्यावर मी प्रेम करतो. जे माझी भक्ती करतात मी त्या सर्वांना ओळखतो. श्रीमद्भागवत या ग्रंथातील आठव्या स्कंधातील आठवा भाग सांगताना स्वामीजी म्हणाले की, “भागवताच्या सर्व वैदिक ज्ञानाचा सार म्हणजे हा आठवा स्कंद आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. व्यासजींचे पुत्र शुकदेव गोस्वामी यांनी अर्जुनाचे नातू परीक्षित महाराजांना ही कथा सांगितलेली आहे. त्या कथेत मानवाची कर्तव्य काय? धर्माचा उद्देश काय आहे ?भगवंताचे अवतार कसे व किती आहेत? याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.
.
भक्ताच्या हाकेला भगवंत कसे धावून जातात हे सांगण्यासाठी नदीत मगरीने पकडलेल्या हत्तीच्या पायाची कथा आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भगवंत कसे धावून येतात हे त्यांनी सांगितले.
आज प्रत्येक जण भौतिक क्षेत्रात अडकलेला आहे, भौतिक संसाराला पार करणे फार कठीण आहे. त्यामुळे भगवंतांना शरण या, शरण येणाऱ्यांचे ते रक्षण करतात मग तो शत्रू असला तरीही’ असे सांगून इतिहासातील उदाहरणांचा आधार घेऊन आपण शरणागती स्वीकारली पाहिजे आपण चांगले श्रवण, कीर्तन, सत्संग व साधना केली तर आपण या भक्तीत संलग्न होऊ “असे ते म्हणाले
चैतन्य महाप्रभूंनी भागवताचा सार संक्षिप्तपणे सांगितला आहे ..
तो असा की सर्वोत्तम धर्म हृदयापासून भक्ती प्रकट करतो आणि भक्ती निष्कलंक व शुद्ध रूपाने केली पाहिजे.” त्यानंतर कीर्तन व भजन असा कार्यक्रम झाला ज्यामध्ये उपस्थित तल्लीन होऊन गेले होते. सत्संगानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या तीन दिवसाच्या वास्तव्यात राधानाथ स्वामी महाराजांनी मार्गदर्शनाबरोबरच शेकडो साधकांना दीक्षा दिली.