बेळगाव लाईव्ह :पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शासन करून मयत डॉक्टरला न्याय द्यावा, या मागणीसाठी शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या विविध संस्थांच्या समूहातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या विविध संस्थांच्या समूहातर्फे संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर -नागराजू यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील बलात्कार व खुनाच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मराठा मंडळ शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून कांही काळ रस्ता रोको केला.
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. अग्रभागी संस्थेच्या बॅनरसह ‘कोलकाता हॉरर्स’ हा निषेधाचा फलक असलेल्या सदर मोर्चामध्ये मराठा मंडळ संस्थेच्या विविध संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.
कोलकता येथील घटनेच्या निषेध, या घटनेस जबाबदार नराधमांना फाशी द्यावी, महिलांना संरक्षण मिळावे अशा आशयाच्या मागण्यांचे फलक हातात धरलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी जोरदारपणे वुई वॉन्ट जस्टीस, बेके बेकू न्याया बेकु, अशा घोषणा देत होते. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर -नागराजू यांच्यासह संस्थेच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींनी डोळ्याखाली लाल रक्ताश्रू रंगवले होते. महिला डॉक्टर वरील अत्याचार व तिची हत्या या घटनेचा निषेध आणि सद्य काळात महिलांवर ओढवत असलेल्या भीषण परिस्थितीचे प्रतिबिंब दर्शविणारी हे रक्ताश्रू साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कोलकाता येथील घटनेस जबाबदार असलेल्यांना कठोर शासन केले जावे. त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी. अत्याचार व खून झालेल्या महिला डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जावा. केंद्राने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक कायदा ताबडतोब अंमलात आणावा, अशा आशयाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना राजश्री हलगेकर -नागराजू यांनी आज मोर्चाने छेडलेल्या उद्देश सांगून कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच सदर घटनेतील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीने “मला फाशीची शिक्षा द्या” असे स्वतःहून म्हटले आहे. मात्र तेवढ्यावर थांबून चालणार नाही मयत महिला डॉक्टर वर सामूहिक बलात्कारच झाला आहे. त्यामुळे तिला न्याय देण्यासाठी सदर निंद्य घटनेस जबाबदार सर्वांची नावे उघड झाली पाहिजेत आणि त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. सदर घटनेची सीबीआयकडून चौकशी केली जात असून ही समाधानाची बाब आहे. मात्र त्यांनी लवकरात लवकर सदर प्रकरण निकालात काढावे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने जशी एका रात्रीत नोटबंदीची अंमलबजावणी केली. तसा निर्णय केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत का घेतला जात नाही? असा सवाल हलगेकर यांनी केला. तसेच हा निर्णय घेणे ही काळाची गरज असून तो घेतला गेला नाही तर भविष्यात अशा आंदोलनांचा देशभरात भडका उडेल.
महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि जोपर्यंत त्या संदर्भात कडक कायदा अंमलात येत नाही तोपर्यंत आम्ही महिला गप्प बसणार नाही असे सांगून कोलकाता येथील घटनेस जबाबदार सर्वांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत ‘कोलकाता हॉरर्स’ हा निषेध फलक मराठा मंडळाच्या प्रत्येक संस्थेवर झळकत राहील, असे राजश्री हलगेकर -नागराजू यांनी शेवटी स्पष्ट केले. यावेळी कांही विद्यार्थिनींनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून कोलकाता येथील घटनेस जबाबदार नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली.