बेळगाव लाईव्ह : नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेला दुर्दैवी कामगार यल्लाप्पा गुंड्यागोळ याच्या आई वडिलांना आपल्या मुलाचे अंत्यविधीपूर्वी तोंड पाहण्याचे भाग्यही लाभले नाही.
उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मुलाची केवळ अस्थीच एका पिशवीत घालून वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. हात-तोंडाशी, वयात आलेल्या मुलाच्या अस्थी अशा पद्धतीने ज्यावेळी वडिलांच्या हाती सोपविण्यात आल्या, त्यावेळी वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा होता. मृत यल्लप्पाच्या आई – वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले…
नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. सदर अग्नी तांडवामध्ये यल्लाप्पा गुंड्यापगोळ या युवा कामगाराचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. काल बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने भिंत हटवून, तसेच मेटल कटरने लिफ्टचे दार कापून यल्लापाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तथापि आगीत पूर्णपणे जळाल्यामुळे त्याचा केवळ सांगाडाच शिल्लक होता. यामुळे सांगाड्याची हाडे उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाडण्यात आली. मंगळवारी दुपारच्या शिफ्टला कामावर गेलेला आपला मुलगा घरी परतलाच नसल्यामुळे चिंतातूर झालेल्या यल्लाप्पाच्या आई-वडिलांना आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एखाद्या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांकडे दिला जातो. मात्र यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या आई-वडिलांना अंत्यविधीपूर्वी आपल्या मुलाचे तोंड पाहण्याचे भाग्यही लाभले नाही. उत्तरीय तपासणीनंतर यल्लाप्पाच्या केवळ अस्थिच एका पिशवीत घालून आई-वडिलांकडे देण्यात आल्या. आणि हे पाहून यल्लाप्पाच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचे हे दुःख पाहून सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.
घडलेल्या घटनेनंतर स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यातील आग दुर्घटने संदर्भात व्यवस्थापन मंडळाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या दुर्घटनेत बळी पडलेल्या यल्लाप्पा यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काल बुधवारी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कारखान्याचे संचालक व संचालक मंडळाविरुद्ध हा एफआयआर दाखल झाला आहे. दुर्लक्षपणाचा ठपका ठेवत ही फिर्याद दाखल करण्यात आली असून भा.द.वि. कलम 106 (1), 125 (बी), 287, 288, सहकलम 190 अन्वये या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.