बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील कोंगळा, गवाळी, पास्टोली या गावांकरीता विजेची सोय करण्यासाठी निघालेल्या जनरेटर व्हॅनला रस्ता खराब असल्याने आबनाळी गावापर्यंतच जाऊन खानापूरकडे परत माघारी परतावे लागल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका वैशाली एम. यांनी दोन दिवसापूर्वी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागास भेट देऊन पावसाच्या अतिवृष्टीमुळे ठप्प असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत माहिती घेतली होती.
त्यावेळी त्यांनी सदर गावांसाठी सध्या तात्पुरत्या वीज पुरवठ्याची सोय करण्याचा आदेश सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांना दिला होता त्यानुसार अभियंता करूर यांनी हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर नागेश देवलतकर यांना सूचना कोंगळा, गवाळी, पास्टोली या गावांना थोडा थोडा वेळ जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याची सूचना केली होती.
सदर सुचनेनुसार नागेश देवलकर यांनी एक जनरेटर भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या सहकाऱ्यासह कोंगळ्याकडे निघाले होते. परंतु पावसामुळे संपूर्ण रस्ता खराब झाल्याने जनरेटर घेऊन जाणारे वाहन आबनाळी गावापर्यंतच जाऊ शकले.
पुढे व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनरेटर घेऊन नाईलाजाने वापस खानापूरकडे परतावे लागले. यावेळी कोंगळा गावचे ग्रा. पं. सदस्य जयवंत गावकर व गावकरी हे त्या ठिकाणी उपस्थित होते.
त्यांनी व हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर नागेश देवलकर यांनी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रस्ता खराब असल्याने जनरेटर व्हॅन पुढे जाऊ शकत नसल्याची माहिती दिली.