बेळगाव लाईव्ह श्रीमाता, श्री भक्ती महिला, समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी आणि ज्ञानमंदिर इंग्लिश माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 20 ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत श्री गणेश फेस्टिवल बेळगाव -2024 चे आयोजन करण्यात आले असून आज या उत्सवाचा दुसरा दिवस महिलांसाठी आयोजिण्यात आलेल्या पाककला स्पर्धेच्या माध्यमातून पार पडला.
मुगापासून बनविलेले तिखट आणि गोड पदार्थ या संकल्पनेवर आधारित या पाककला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुगाचे तिखट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत अनिता लोहार प्रथम, वनिता शिरोळ द्वितीय आणि गीता जुवेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
तर ज्योती काळे, वंदना पाटील आणि स्नेहल बांदीवाडेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पिकवला. मुगाचे गोड पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रेखा देशपांडे, द्वितीय क्रमांक कल्पना पवार आणि तृतीय क्रमांक नमिता पाटील यांनी पटकाविला. तर उत्तेजनार्थ श्रद्धा काळे, गौरी खांडेकर, नेहा खटारे यांनी पटकाविला. धनश्री हलगेकर आणि प्रियांका कलघटगी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना श्री भक्ती महिला सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षा रुपाली जनाज म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून महिलांसाठी स्पर्धा, विशेष सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. संस्थेचे संस्थापक मनोहर देसाई यांनी या फेस्टिव्हलची सुरुवात केली होती. आजदेखील तितक्याच उत्साहाने हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. यादरम्यान आयोजिण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी शाहीर अभिजीत कालेकर लिखित आणि लोक संस्कृती नाट्यकला संस्था, खानापूर प्रस्तुत ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. तर या उत्सवाच्या समारोपादिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे. गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून आयोजिण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ बेळगावकरांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.