बेळगाव लाईव्ह : श्रीमाता, श्री भक्ती महिला, समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी आणि ज्ञानमंदिर इंग्लिश माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 20 ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत श्री गणेश फेस्टिवल बेळगाव -2024 चे आयोजन करण्यात आले असून आजपासून या उत्सवाचे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उदघाटन करण्यात आले.
श्रीमाता सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये विविध सहकारी संस्थांच्या महिला पदाधिकारी आणि मान्यवर महिलांच्या उपस्थितीत आज दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विशेषतः महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आज जवळपास ८० ते १०० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
यावेळी श्रीमाता सहकारी पतसंस्थेच्या संचालिका डॉ. मीना पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, विविध सहकारी संस्थांच्या संयुक्तंश्रयाने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज होम मिनिस्टर या विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्स्फूर्त पद्धतीने महिलांनी सहभाग घेतला होता.
उद्या पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यानंतर शाहीर अभिजीत कालेकर लिखित आणि लोक संस्कृती नाट्यकला संस्था, खानापूर प्रस्तुत ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाच्या समारोपादिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उद्यापासून संपूर्ण उत्सवादरम्यान नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.