बेळगाव लाईव्ह : विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी विभाग 8 च्या विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी जागतिक उद्योजकता दिन साजरा करण्यात आला. उद्योजकता दिनाच्या निमित्ताने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी “Emerge-24” या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हेल्मेट उद्योगाचे वेगा ऑटो ॲक्सेसरीजचे संस्थापक आणि एमडी दिलीप चांडक या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्हीटीयूचे कुलपती प्रा.विद्याशंकर एस. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना दिलीप चांडक यांनी, वेगा उद्योगाच्या वाढीदरम्यान आलेल्या चढ-उतारांबद्दल माहिती दिली. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी अडचणी आणि तोटे एकत्र येतात आणि ते तुम्ही सहन केले तरच तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकता. उद्योगाच्या वाढीदरम्यान, गुणवत्ता आणि व्यवस्थापनाबद्दल अनेक प्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया येणे सामान्य आहे, आपण अशा क्षणी घाबरू नये कारण आपण प्रत्येकाच्या मागणीनुसार आणि आवडीनुसार कार्य करू शकत नाही आणि आपण सर्वांना आनंद देऊ शकत नाही, सराव , सातत्य आणि धीर यातून यश साधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात व्हीटीयूचे कुलपती प्रा.विद्याशंकर एस. म्हणाले की, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात कर्मचाऱ्यांऐवजी उद्योजक विकसित होण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीला उद्योजक बनायचे असेल तर त्यासाठी आवड असणे गरजेचे आहे. स्वारस्याने उद्योजक घडतात. परंतु आज विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणांमध्ये याची आवड नाही. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना नवनवीन विचार करून प्रोत्साहन देण्याची गरज असून आणि स्टार्ट-अप तयार करण्यासाठी आणि उद्योजक म्हणून वाढण्याची कौशल्ये शिकविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. व्हीटीयूने विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली असून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. या दिशेने आज “इमर्ज-24” या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यातून नवीन उद्योग निर्माण करण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीटीयूचे कुलपती प्रा. बीईई रंगास्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्हीआरआयपीचे संयोजक संतोष ईट्टनगी यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमास व्हीटीयूचे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.