Monday, January 20, 2025

/

‘कोटींच्या उड्डाणा’ने विकास कोसळणार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : मागील पंधरा दिवसांपासून बेळगावमध्ये एकच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे.. २० कोटींची भरपाई….! विकासकामांतर्गत नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या भूसंपादनामुळे मनपाच्या तिजोरीला फटका बसला असून बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी बी रोड दरम्यान राबविण्यात आलेल्या रस्ते विकासकामात नुकसानग्रस्त मालमत्ताधारकांनी उच्च न्यालयालात धाव घेत मनपाला हादरवून सोडले. दोनवेळा आदेश देऊनही न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तिसऱ्यांदा निर्वाणीचा आदेश बजावल्यानंतर मनपाचे डोळे उघडले असून आता याप्रकरणी विस्थापितांना भरपाई देण्यासाठी मनपाला कसरत करावी लागणार आहे.

विकासाच्या नावावर आधीच बेळगाव शहराचा बट्ट्याबोळ करण्यात आला आहे. रस्ते, गटारी, पथदीप यासह अनेक कामाच्या नावावर दर्जाहीन विकासकामे जनतेच्या माथी मारण्यात आली. अशातच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा जन्म झाला आणि शहराच्या विद्रुपीकरणात आणखी एक भर पडली. कोट्यवधींचा चुराडा करूनही अद्याप विकासापासून वंचित राहिलेल्या बेळगावकरांच्या समस्येत विस्थापितांना भरपाई देणाऱ्या समस्येने आणखीनच भर पाडली आहे. मनपाच्या तिजोरीत असलेला खणखणाट आणि यातून भरपाई, थकबाकी याचा बोजा उचलता उचलता मनपाचे कंबरडे मोडणार हे निश्चित आहे. परंतु मनपा आपल्यावर आलेले हे बालंट देखील जनतेच्याच माथी मारणार असल्याचे प्रत्यक्षदर्शी जाणवत आहे.

सध्या महानगरपालिकेकडे केवळ 39 कोटी 92 लाख रुपये असल्याची माहिती लेखाधिकारी किरण चंदरगी यांनी नुकतीच सभागृहाला दिली. या निधीतूनच 20 कोटी रुपयांचा निधी प्रांताधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 20 कोटी रुपयांच्या भरपाईनंतर तिजोरीत खडखडाट होईल आणि महापालिकेला कारभार चालविण्यासाठी दर महिन्याला आठ कोटी रुपयांचा निधी लागतो तो निधी जमा करण्यासाठी पुन्हा याचा भार जनतेवर लादण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मनपाला भूसंपादन प्रकरणी २०.७० कोटी रुपयांची भरपाई देणे आहे. या व्यतिरिक्त हेस्कॉम आणि जीएसटीची थकबाकी देखील मनपाला भरावयाची आहे. भरपाई, थकबाकी याव्यतिरिक्त विकासकामांसाठीही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. मात्र सध्याची मनपा तिजोरीची अवस्था ठणठणगोपाळ असून हा सर्व भार मनपाच्या डोईजड ठरणार आहे.City corporation funds

नियमबाह्य भूसंपादनाप्रकरणी या २ केस नसून अद्याप अशा ६ केस ताटकळत असल्याची माहिती उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी पत्रकारांना दिली असून मनपासमोर अद्याप सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, अर्धवट परिस्थितीत असणारी विकासकामे, इतर विस्थापितांना नुकसान भरपाई, विविध विभागाची थकबाकी अशी कोट्यवधींची कमतरता आहे. अशा परिस्थितीत मनपा बेळगावचा विकास कसा करणार? भविष्यात विकासकामे कशी राबविणार? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

आधीच निधीची कमतरता असल्याने शहरातील अनेक प्रभाग नागरी सुविधांपासून वंचित आहेत. जनतेच्याच पैशातून करण्यात आलेली अर्धवट स्थितीतील विकासकामे जनतेच्या समस्येत भर घालत आहेत. दर्जाहीन कामामुळे वारंवार त्याच-त्या ठिकाणी तीच विकासकामे राबवून निधी वाया घातला जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आणि आता मनपा अधिकाऱ्यांच्या, तत्कालीन आयुक्त, सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा मनपाला फटका बसला असून याची सारी भरपाई जनतेच्या करातून केली जाणार असल्याची चर्चाही होत आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, राजकारण्यांचा मनमानी कारभार याचा फटका जनतेला बसणार असून आता याचा जाब जनतेने देखील विचारायला हवा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.