बेळगाव लाईव्ह:बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील सुळगा येथे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची दखल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतली असून हा रस्ता दुरुस्ती तातडीने करण्यात यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी रोशन यांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अचानकपणे बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी सुळगा गावात राज्यमार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या.सुळगा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. त्यामुळे वाहन चालकातून वारंवार मागणी होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
आताही पाऊस थांबल्यानंतर केवळ माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार करण्यात आला होता त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
पण आता जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीच याची दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या पावसात बेळगाव सुळगा उचगाव रस्त्याची चाळण झाली आहे हजारो खड्ड्यांचे साम्राज्य या रस्त्यावर निर्माण झाले आहे त्यामूळे वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. पाहणी वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांच्यासह अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.