बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पं बसविण्यात यावीत, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन सुरु असून रेल्वे प्रशाससानाने याबाबत उदासीनता दाखविल्याने शिवभक्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्थक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
रेल्वेस्थानकावर दोन्ही महापुरुषांची शिल्पं बसविण्यात यावीत यासाठी रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे स्थानकाला घेराव घालून आंदोलन छेडण्यात आले.
कर्नाटक दलित संघर्ष समिती, समिती नेते रमाकांत कोंडुसकर आदींच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. गेल्या दीड वर्षांपासून सदर मागणी करण्यात येत असून रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या विरोधात आज निषेध मोर्चासह रेल्वे स्थानकासमोर निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर शिल्पं बसविण्यात यावीत, यासाठी मंगळवार पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला होता. बुधवारी दुपारपर्यंत प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दलित समाजाचे नेते संतोष कांबळे, मल्लेश कुरंगी आदींच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांचाही सहभाग आणि पाठिंबा होता.
रेल्वे प्रशासन भिमराय आणि शिवरायांच्या बाबतीत उदासीन का ? असा सवाल उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात दलित संघर्ष समितीचे आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.