Wednesday, December 25, 2024

/

हरी काका कंपाउंडसह शेतकऱ्यांना नगरसेवक मंडोळकर यांचा दिलासा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील हरिकाका कंपाउंड ते लेंडी नाला दरम्यानच्या सर्व्हिस रोड संदर्भातील समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्याबरोबरच नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी नाला स्वच्छतेला चालना दिल्याने दिलासा मिळालेल्या हरी काका कंपाऊंड येथील गॅरेज मालक, उद्योजक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शहरालगत पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हरिकाका कंपाउंड या विविध उद्योग असलेल्या वसाहतीला विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमध्ये प्रामुख्याने लेंडी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे जलमय होणारे हरी काका कंपाउंड आणि या ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर चालणारे गैरप्रकार यांचा समावेश आहे. यासंदर्भात येथील गॅरेज मालक, उद्योजक आणि शेतकऱ्यांनी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत नगरसेवक मंडोळकर यांनी आज बुधवारी सकाळी हरी काका कंपाउंड येथे भेट देऊन पाहणी करण्याद्वारे सर्व समस्यां जाणून घेतल्या. फक्त समस्या जाणून न घेता त्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने लेंडी नाल्याच्या सफाईचे काम देखील हाती घेतले.

यावेळी बेळगाव लाईव्हनी बोलताना शेतकरी नेते नारायण सावंत यांनी सांगितले की, आम्ही शेतकरी आणि या भागातील गॅरेज मालकांनी तुंबलेल्या लेंडी नाल्याबद्दल माहिती देताच नगरसेवक शिवाजी मंडोळकर आज स्वतः सोबत दोन जेसीबी घेऊन येथे दाखल झाले आहेत. त्यांनी गरज पडेल तेंव्हा सदर जेसीबीचा वापर करा, असे आम्हाला सांगितले आहे. या जेसीबीद्वारे सध्या आम्ही लेंडी नाल्याच्या ब्रिजच्या एका पाईपच्या ठिकाणी साचलेला गाळ कचरा काढण्याचे काम हाती घेतले आहे.Corporator

यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास मदत झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून जलमय झालेल्या हरिकांका कंपाऊंडला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाल्याच्या ठिकाणी पुलाखाली काँक्रीट बॉक्स घालण्याऐवजी पाईप घालण्याची चुकीची पद्धत अवलंबल्याने पावसाळ्यात शहरालगतच्या हरी काका कंपाउंड सारख्या परिसर जलमय होत आहे.

जर पूरसदृश्य परिस्थितीचे हे संकट कायमचे निकालात काढायचे असेल तर येथील पुलाच्या ठिकाणी पाईप ऐवजी दोन काँक्रीटचे बॉक्स घातले जावेत. ज्यामुळे पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा तर होईलच शिवाय उन्हाळ्यात हे काँक्रीट बॉक्स ये -जा करण्यासाठी वहिवासी वहिवाटीसाठी सोयीचे ठरतील. हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर त्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, हरी काका कंपाउंडपासून लेंडी नाला दरम्यानचा सर्व्हिस रोडचा जो परिसर आहे या ठिकाणी शहरातील घाण, केरकचरा आणून टाकला जातो. तसेच मृत जनावरे आणून टाकली जातात. सर्व्हिस रोडच्या आडोशाला जुगार, मटका, मद्यपान वगैरे गैरप्रकार सर्रास सुरू असतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच प्रखर झोताचे दिवे बसवले जावेत अशी मागणी आम्ही नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ताबडतोब उद्या शहराच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सदर समस्या मांडण्याचे आश्वासन दिले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी यावेळी बोलताना हरीकाका कंपाउंड ते लेंडी नाला पर्यंतचा सर्व्हिस रोड या परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी मला येथे निमंत्रित करण्यात आले होते. मी या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सदर समस्यांचे निवारण करण्यासाठी मी महापालिकेमध्ये पाठपुरावा करणार आहे या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रखर दिवे बसवण्याची जी मागणी करण्यात आली आहे, त्या मागणीची मी निश्चितपणे पूर्तता करेन, असे सांगितले. याप्रसंगी हरिकाका कंपाउंड येथील गॅरेज मालक, उद्योजक आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.