बेळगाव लाईव्ह :कोलकता येथील डॉक्टर महिलेचे बलात्कार व खून प्रकरण तसेच तेथील दंग्यांना जबाबदार गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगावने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण गोविंदराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बांगलादेशातील सध्याच्या घडामोडींनी परिस्थिती आणखी अस्थिर केली आहे, परिणामी हिंदू समुदायावरील हल्ले वाढले आहेत आणि देशभरातील अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड झाली आहे. हिंदूंना मारल्याचा आनंद दंगलखोर साजरा करत असल्याचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत.
या घटनांनी या प्रदेशातील हिंदूंविरुद्धच्या लक्ष्यित हिंसाचाराच्या नव्या आणि चिंताजनक नमुन्याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. आणखी एक घटना जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. कोलकता येथे गेल्या 9 ऑगस्ट 2024 रोजी एका महिला डॉक्टरचा अमानुष बलात्कार करून खून करण्याच्या घटनेबद्दल आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो.
या भयानक गुन्ह्यामुळे समाजाला हादरवून सोडले असून ज्यामुळे सदर घटनेस जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा दंगे पसरवणाऱ्या आणि बलात्कार व खुनाच्या घटनेस जबाबदार गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी आवश्यक क्रम घेतले जावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.