बेळगाव लाईव्ह :टिळकवाडीपासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावरील मंडोळी रोडवर असलेल्या प्रभाग क्र. 30 मध्ये येणाऱ्या वीर सावरकर कॉलनी या वसाहतीची मूलभूत सुविधांअभावी दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी तात्काळ अत्यावश्यक नागरी सुवधा पुरवाव्यात, अशी मागणी या कॉलनीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या वीर सावरकर कॉलनीतील स्त्री -पुरुष रहिवाशांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना वीर सावरकर कॉलनीतील प्रमुख नागरिकांपैकी एकाने सांगितले की, गेल्या कांही वर्षांपासून आमच्या वीर सावरकर कॉलनीमध्ये पिण्याचे पाणी, रस्ते वगैरेंसारख्या साध्या नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. कॉलनीमध्ये गटारी आणि ड्रेनेजची समस्या कायम आ वासून उभी असते. आमच्या वसाहतीतील नागरी समस्यांबद्दल गेल्या 5 -6 वर्षांपासून आम्ही आमदार, खासदार, संबंधित अधिकारी अशा सर्वांना निवेदनात सादर करून देखील आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. थोडीफार विकास कामे करून आमच्या कॉलनी कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आमच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.
वीर सावरकर कॉलनीमध्ये मूलभूत नागरी सुविधांची मोठी वानवा आहे. त्यामुळे येथील अबालवृद्धांची विशेष करून महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी असलेल्या एका ओल्ड एज होम अर्थात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने खराब रस्त्यावर फिरणे जोखमीचे झाले आहे. कॉलनीतील रस्ते व्यवस्थित नाहीत, पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत. सध्याच्या पावसामुळे तर आमच्या कॉलनीतील रस्त्यांची चिखलामुळे इतकी वाताहत झाली आहे की त्यावर दुचाकी चालवणे कठीण झाले आहे.
बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना राबवली जात असली तरी आमची कॉलनी महापालिका हद्दीत टिळकवाडी पासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर असून देखील विकासाच्या बाबतीत ती मागासलेलीच आहे. तेंव्हा सरकार प्रशासनाकडून इतर कोणताही मोठा विकास आम्हाला नको, किमान फक्त मूलभूत नागरी सुविधा तरी आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्या नागरिकाने केली.
आमच्या वीर सावरकर कॉलनीतील रस्त्यांवर पथदिप नाहीत. खड्डे पडण्याबरोबरच सध्या चिखलमय झालेल्या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी अंधारात तर विशेष करून महिलांना जीव मुठीत धरून वाटचाल करावी लागते लागते. खराब रस्त्यामुळे साधी रिक्षाही कॉलनीत येऊ शकत नाही वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही. परिवहन बस सेवा नसल्यामुळे कॉलनीत बस थांबा देखील नाही.
एकंदर परिस्थिती पाहता या वसाहतीमध्ये घर घेतल्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे, अशी खंत वीर सावरकर कॉलनीतील महिलांनी व्यक्त करून सध्या तूर्तास आमच्या कॉलनीतील रस्त्याची इथं पातळीवर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. याप्रसंगी कॉलनीतील स्त्री -पुरुष रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.