Thursday, September 19, 2024

/

तब्बल 22,000 पैकी फक्त 4,831 मोकाट कुत्र्यांची नसबंदी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सध्या 22,000 मोकाट कुत्री असून गेल्या दोन वर्षात यापैकी फक्त 4,831 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी दिली. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर महापौर सविता कांबळे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेचे नव्याने कंत्राट देण्यासाठी येत्या 15 दिवसात निविदा जारी करण्याचा आदेश दिला आहे. याबरोबरच शस्त्रक्रियेची जागा श्रीनगर येथून हलवण्याची आणि मोकाट कुत्री व जनावरे पकडण्यासाठी समर्पित पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये अपक्ष नगरसेवक अजीम पटवेगार यांनी मोकाट्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा झाली. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मयत झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. शहरातील एकंदर परिस्थिती पाहता भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत वेळीच पावले उचलली नाही तर महापालिकेचा सर्व निधी नुकसान भरपाई देण्यातच खर्च होईल अशी चिंता आमदार असिफ सेठ यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीनगर येथील गोशाळेमध्ये कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया होत असल्यामुळे त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी केली. राठोड यांची तक्रार गांभीर्याने घ्यावी अशी मागणी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केली.

विशेष करून नगरसेवक शंकर पाटील आणि रवी साळुंखे यांनी शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांची समस्या गांभीर्याने घेण्याची मागणी केली. परिणामी महापौरांनी कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नवा कंत्राटदार नियुक्त करण्याचा आदेश बजावला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्याची गरज आमदार सेठ यांनी व्यक्त केली. सध्या दररोज व दरमहा किती शस्त्रक्रिया होतात याची माहिती नगरसेवकांनी बैठकीत विचारली.

तेंव्हा याबाबतची विसंगत माहिती डॉ. नांद्रे यांनी दिल्यामुळे नगरसेवक संतापले. आतापर्यंत कंत्राटदाराला किती बिल देण्यात आले? याची माहितीही डॉ. संजीव नांद्रे यांना देता आली नसल्यामुळे या विषयावरील चर्चा आणखी गंभीर झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.