बेळगाव लाईव्ह:बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 1763 एकर व्याप्तीच्या हद्दीतील नागरी वसाहतीचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यापूर्वी सर्वांकष सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र केवळ 112 एकर जागेतच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे ज्या परिसराचा महापालिकेत समावेश व्हावा अशी मागणी आहे, त्याच परिसराचेच सर्वेक्षण होणार नसल्याने सर्वंकष सर्वेक्षण फुसका बार ठरण्याची शक्यता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडील नागरी वसाहतीच्या हस्तांतरणाबाबत गेल्या जुलै महिन्यात बैठक झाली होती. तसेच हस्तांतरणापूर्वी कॅन्टोन्मेंट हद्द 1763 एकरचे असल्याने या सर्व भागांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सर्वेक्षणासाठी 45 जणांचे पथक नियुक्त करताना महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी बजावलेल्या आदेशातही 1763 एकरचे सर्वेक्षण करण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता प्रत्यक्षात फक्त 112 एकर जागेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नकाशे उपलब्ध झाले असून लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होणार असल्याचे समजते.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व म्हणजे 1763 एकरचे सर्वेक्षण होणार नसेल तर मग हस्तांतरणाचा वाद मिटणार कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तथापि यामुळे महापालिकेच्या पथकाचे काम मात्र सोपे झाले आहे. महापालिकेचे मोजके कर्मचारी व भूमापक या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत.
आता सर्वेक्षण केवळ 112 एकरचेच होणार आहे. तथापि ज्या परिसराचा महापालिकेत समावेश व्हावा अशी मागणी आहे. त्याच परिसराचे सर्वेक्षण होणार नसल्याने सर्वंकष सर्वेक्षण एक फार्स ठरण्याची शक्यता आहे.