बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 112 एकर क्षेत्राचा सर्वेक्षण अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करावा, असा निर्णय बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या अहवालानंतरच पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने आयोजित केलेल्या या बैठकीला उपायुक्त मोहम्मद रोशन, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने कमिटी स्थापन केल्यानंतर जंबो पथकाने कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिलेल्या 112 एकर जागेचे सर्वेक्षण केले. मात्र, बंगला परिसराचाही सर्वेक्षणात समावेश करावा, अशी मागणी करत परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी यापूर्वी तीन ऑनलाइन बैठका झाल्या, परंतु त्यात कोणताही निर्णय झाला नाही.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द 1,763 एकरमध्ये पसरलेली आहे, ज्यामध्ये लष्करी आणि निवासी दोन्ही विभागांचा समावेश आहे. बाजार परिसर देखील महापालिकेच्या ताब्यात देणे अपेक्षित असताना बोर्डाकडून फक्त रहिवासी भाग दिला जाणार आहे.
आता त्यामध्ये बंगला परिसराचाही समावेश व्हावा यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. बेंगलोरमध्ये अचानक झालेल्या ऑफलाइन बैठकीमुळे आगामी चर्चेकडे तसेच याबाबतीत राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे कॅन्टोन्मेंट वासियांसह शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.