बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांच्या जमिनी बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावावर हस्तांतर करण्याचे प्रकार वाढीस आले आहेत.
पूर्व भागातील काही अधिकारी, ग्रा.पं. सदस्य आणि एजंटांच्या कारनाम्याची धक्कादायक माहिती बेळगाव लाईव्ह कडे उपलब्ध झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या एजंट आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वाढू लागली आहे.
‘कुंपणच शेत खाते’ हि म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. रिंगरोड, बायपास, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, कधी शेतपिकाला मिळणार कवडीमोल भाव यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्याच्या पाठीत आपल्याच लोकांनी खंजीर खुपसण्याचे काम केल्याच्या घटना वाढत चालल्याचे निदर्शनात आले आहे. बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात काही बडे अधिकारी, एजंट, ग्राम पंचायत सदस्य यांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला असून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बोगस कागदपत्रे बनवून दुसऱ्याच्या नवे हस्तांतरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. काही बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्राम पंचायत सदस्य, एजंट यांच्या संगनमताने तालुक्याच्या पूर्व भागात असे प्रकार घडत असल्याचे समोर आले असून यासंदर्भात येत्या १५ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे दादही मागण्यात येणार असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागा नंतर आता असे प्रकार सर्वत्रच घडत आहेत. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका मोठ्या ग्राम पंचायती व्याप्तीत घडलेल्या प्रकारा नंतर काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांना धमकी दिली जात असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. काही शेतकऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर जाऊन ‘वशिला’ लावल्यामुळे यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ५ ते ६ शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने पूर्व भागात अन्याय झाला असून ज्या शेतकऱ्यांनी वरिष्ठांच्या वशिल्याने आवाज उठविला त्यांच्यासमोर अधिकारी आणि संबंधितांनी चूक कबूल करून पुन्हा शेतकऱ्याच्या नावावर जमिनी करून दिल्याचेही वृत्त आहे.
या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे असून अशा प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना चाप बसविणे गरजेचे आहे. या प्रकाराबाबत येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागायचे ठरविले असून जिल्हाधिकाऱ्यांसमोर या बाबत अधिकृतरीत्या तक्रार देखील देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.