बेळगाव लाईव्ह : राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप – जेडीएसने पदयात्रा प्रारंभ केली असून मुडा घोटाळा प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या विरोधात आता मुख्यमंत्री समर्थक संघ – संघटना आणि संस्थांनी आंदोलन छेडत विरोधक मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप करत विरोधकांनी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये कर्नाटक प्रदेश कुरबर संघ, शोषित समाज महासंघ, कर्नाटक राज्य मागासवर्गीय जाती संघ बेळगाव विभाग यांच्या वतीने भाजप – जेडीएसचा निषेध करत रॅली काढण्यात आली.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढून भाजप आणि जेडीएस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय चारित्र्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हा डाव आखला असून गेल्या ४५ वर्षांच्या सिध्दरामय्यांच्या कारकिर्दीवर कोणताही डाग नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना नोटीस बजावली आहे या मागे दबाव असल्याचे स्पष्ट होत असून राज्यपालांनी दबावाला बळी न पडता कोणतेही निर्णय घ्यावेत अन्यथा राजभवनाला घेराव घालून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार असिफ सेठ बोलताना म्हणाले, भाजप आणि जेडीएसने सिध्दरामय्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा कट रचला आहे. राज्यपालांनी लोकशाहीनुसार काम करणे गरजेचे असून ते कुणाच्यातरी दबावाखाली येऊन काम करत आहेत. घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई होईलच परंतु राज्यपालांनी आपली जबाबदारी विसरल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागासवर्गीयांना घेऊन राजभवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे बोलताना म्हणाले, दलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय अशा संपूर्ण सोशीत समाजाला न्याय देणारे सिद्धरामय्या हे एकमेव नेते आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळेच ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून गरिबांना आणि मागासवर्गीयांना न्याय देण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे. त्यांच्या विरोधात विरोधक षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी कर्नाटक प्रदेश कुरबर संघ, शोषित समाज महासंघ, कर्नाटक राज्य मागासवर्गीय जाती संघ बेळगाव विभाग, विविध मागासवर्गीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.