बेळगाव लाईव्ह:केंद्र सरकारने कर्नाटकातील विविध रेल्वे योजनांसाठी मंजूर केलेल्या निधीची यादी नैऋत्य रेल्वे खात्याने नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यामध्ये कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड या नव्या रेल्वे मार्गासाठी केंद्राने फक्त 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्य सरकारने अद्यापपर्यंत बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे या प्रकल्पाला केंद्राने नाममात्र 20 कोटी रुपयांचे अनुदान अर्थात निधी मंजूर केला आहे.
हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या प्रत्येकी 50 टक्के सहकार्याने पूर्ण केला जाणार आहे. सदर प्रकल्पासाठी एकूण 927 कोटी रुपयांचा खर्च येणार असून यामध्ये केंद्र सरकारचा 50 आणि राज्य सरकारचा 50 टक्के वाटा असणार आहे.
हा प्रकल्प म्हणजे खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी आपली इच्छाशक्ती दाखविली पाहिजे.
नियोजित कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राज्य सरकारने अद्याप पूर्ण केलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज रेल्वे मार्ग उभारणीचे काम सुरू केले जाणार नसल्याचे रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सक्त सूचना केली आहे मात्र हे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. आता रेल्वे खाते महसूल खाते आणि या प्रकल्पाला विरोध करणारे शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या निकालात काढण्याची जबाबदारी खासदार जगदीश शेट्टर यांच्यावर आहे.
या नव्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनामध्ये सुपीक शेत जमीन जाणार असल्यामुळे हा मार्ग पडीक जमिनीतून नेण्यात यावा अथवा निर्धारित केलेल्या नुकसान भरपाई पेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी करून केके कोप्पसह संबंधित अन्य गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षपात न करता यावर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.