बेळगाव लाईव्ह :कित्तूरमार्गे धारवाड -बेळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून केवळ 10 कि.मी. भूसंपादन बाकी आहे, असे स्पष्ट करून हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काल गुरुवारी बेळगाव येथे दिले.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत नुकत्याच केलेल्या आपल्या भाषणात कर्नाटक सरकारने धारवाड -बेळगाव रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून दिली नसल्याचा खुलासा केला.
त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले आहे. कित्तूरमार्गे जाणारा 73 कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग रेल्वे खाते आणि कर्नाटक सरकार यांच्यात खर्चाच्या वाटणीच्या आधारावर मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी जमीन मोफत देणे अपेक्षित आहे. 888 एकर जागेसाठी मागणी सादर करूनही अद्यापपर्यंत कोणतीही जमीन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
तथापि, द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीचा संदर्भावर जोर देत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नियोजित धारवाड -कित्तूर -बेळगाव रेल्वे मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले गेले आहे, फक्त थोडासा भाग शिल्लक आहे, असे स्पष्ट केले.