बेळगाव लाईव्ह:पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातून वाहणाऱ्या सात नद्यांना वाहणाऱ्या पूर आला आहे. वाढत्या पाण्याने हजारो एकर जमीन व्यापली असून शेकडो गावे जलमय झाली आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत
कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, मार्कंडेय आणि हिरण्यकेशी नद्या दुथडी भरून वाहू लागल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या नद्यांना आलेल्या पुरामुळे आजपर्यंत 46 गावे पाण्याखाली गेली आहेत. ज्यामुळे 3,684 कुटुंबातील 10,304 लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे या लोकांना आपली घरे सोडावी लागली आहे. घरासह सर्व चीजवस्तूंचा त्याग करून या सर्वांनी काळजी केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे.
पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाने 54 काळजी केंद्रे स्थापन केली आहेत. जेथे विस्थापित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबे, पाळीव प्राणी आणि पशुधन आश्रय घेत आहेत. स्वतःच्या अनिश्चित भविष्याबद्दल चिंतेत असलेले लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक या केंद्रांमध्ये भरलेले आहेत.
नद्यांच्या पुरामुळे जिल्ह्यातील 12 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 535 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पुरात दुर्दैवाने 5 जणांना जीव गमवावा लागला आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील 40 पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी बाहेरील जगाशी संपर्क तुटल्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम घाटात अविरत पडणारा पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने पूर पीडितांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे.