बेळगाव लाईव्ह:दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सव शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शनिवारी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन विविध सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कपिलेश्वर तलावाची पाहणी केली.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी (डीसी) रोशनी यांनी हेस्कॉम, महापालिका, महसूल खाते, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खाते या खात्यांचा सहभाग असणारी एक खिडकी (सिंगल विंडो) सुविधा सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कार्यरत राहावीत. मंडप उभारणीला परवानगी देताना ते किती आकाराचे असावेत हे पाहिले जावे. मागील वर्षाप्रमाणेच त्यांचा आकार असावा. त्यापेक्षा मोठा नको, अशी सूचना केली. आमच्याकडे ज्या तक्रारी येतीलल त्या आम्ही पोलीस वगैरे संबंधित खात्यांकडे पाठवू. हेस्कॉमने 50 धोकादायक स्थळांपैकी 35 स्थळांच्या ठिकाणची दुरुस्ती करण्यात आली आहे. आता उर्वरित स्थळांच्या दुरुस्तीचे काम येत्या 3 सप्टेंबरपूर्वी पूर्ण केले जावे. संयुक्त पाहणी दौऱ्यानंतर हेस्कॉमकडून ही दुरुस्ती केली जाते. त्यामुळे केबल टीव्ही, इंटरनेट सेवा पुरवणारे आणि बीएसएनएल यांच्याशी पुन्हा बैठक करून सर्वांची जी काही दुरुस्तीची कामे आहेत ती एकाच वेळी पार पडतील या अनुषंगाने समन्वयाने काम करावे. रस्त्यावर आडव्या खाली लोंबकळणाऱ्या तारा व्यवस्थित कराव्यात.
गणेशोत्सव काळात कोणतीही अडचण समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस खाते, सेक्टर मॅजिस्ट्रेट, महापालिका प्रशासन, हेस्कॉम प्रशासन, केबल टीव्ही व इंटरनेट पुरवठादार, बीएसएनएल, वनखाते आणि अग्निशमन दल या सर्व खात्यांनी संयुक्तरीत्या सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणानंतर त्या त्या विभागाने त्यांची त्यांची आवश्यक कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
फटाक्यांची विक्री दिवाळीप्रमाणे खुल्या सुरक्षित जागी केली जावी आणि त्यासाठीचा आदेश लवकरच जारी करावा. अग्निशमन दल आणि आरोग्य खात्याचा सल्ला घेऊन मंडपाचे आकार तेथील रस्त्यानुसार निश्चित केले जावेत. आरोग्य सेवेच्या अनुषंगाने शहरात चार ठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. महापालिकेने रस्त्यांच्या दर्जाची पाहणी करावी. सध्या दोन दिवसापासून पाऊस कमी झाला आहे त्यामुळे रस्त्यांची पाहणी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
पोलीस आणि एल अँड टी कडून ज्यादा प्रकाश व्यवस्थेची मागणी केली जात आहे, त्याची पूर्तता केली जावी. पोलीस आयुक्तांनी टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारण्याची सूचना केली असून त्याचीही अंमलबजावणी केली जावी. बोगारवेस धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे सुसज्ज प्रेक्षक गॅलरी उभारली जावी. महापालिकेने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून फलक आणि बॅनर्स लावण्याची परवानगी द्यावी. प्रक्षोभक फलक, बॅनर्स उभारले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. मंडप परिसरात स्वच्छतेची काळजी घ्यावी. शहरात फिरत्या स्वच्छतागृह (मोबाईल टॉयलेट), स्वच्छ पिण्याचे पाणी यांची सोय केली जावी अशा विविध सूचना करून एकंदर गणेशोत्सव काळात जनतेची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जावी असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
बैठकीस पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांच्यासह हेस्कॉम, महापालिका, महसूल खाते, पोलीस खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, वनखाते, अग्निशमन दल, बीएसएनएल वगैरे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.