बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील बैलूर ग्रामपंचायतच्या व्याप्तीत येणाऱ्या कौलापूरवाडा या गवळीवाड्यानजीक असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात अस्वच्छता व प्रदूषण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर सदर पोल्ट्री फार्म चालकांवर थेट कायदेशीर कारवाई करावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशु संगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
बैलूर ग्रामपंचायत (ता. खानापूर) व्याप्तीत येणाऱ्या कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्मची काल गुरुवारी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी (डीसी) उपरोक्त सूचना केली.
याप्रसंगी पशु संगोपन खात्यासह जिल्हा पर्यावरण खात्याचे अधिकारी आणि खानापूरचे तहसीलदार उपस्थित होते. याबाबतची अधिक माहिती अशी की, कौलपूरवाडा अर्थात गवळीवाड्या जवळ जवळपास 150-200 मीटरवर कॉलिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे पोल्ट्री फार्म अर्थात कुकुट पालन केंद्र आहे. गेल्या सुमारे 15 वर्षापासून या ठिकाणी असणाऱ्या या पोल्ट्री फार्मच्या देखभालीकडे अलीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्याचप्रमाणे डास माशांचा प्रादुर्भाव वाढवून नजीकच्या गवळीवाड्यातील लोकांचे विशेष करून वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर पोल्ट्री फार्म अन्यत्र हलवावा अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच सदर पोल्ट्री फार्म अन्यत्र हलवावा या मागणीसाठी खानापूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे नुकतेच आंदोलनही छेडण्यात आले होते.
सदर पोल्ट्री फार्म विरुद्ध स्थानिकांकडून वारंवार तक्रार करून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी नुकतेच खानापुरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यास आले होते. त्यावेळी गवळीवाडा येथील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे आपल्या वसाहती नजीकच्या पोल्ट्री फार्म विरुद्ध तक्रार केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.
मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काल गुरुवारी पोल्ट्री फार्मच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र त्यावेळी अस्वच्छता, दुर्गंधी, डास, माशा, वगैरे कोणतीच वादग्रस्त बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करताच स्थानिक रहिवाशांनी त्याबाबत खुलासा करताना दरवेळी कोणी अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार हे समजतात पोल्ट्री चालकाकडून तात्पुरती स्वच्छता केली जाते औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते, असे स्पष्ट केले. पोल्ट्री चालक कॉलिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा हा बनेलपणा लक्षात येताच जिल्हाधिकारी रोशन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशु संगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांना सदर पोल्ट्री फार्मवर बारीक लक्ष ठेवण्याची तसेच या फार्ममुळे परिसरात अस्वच्छता व प्रदूषण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल थेट कायदेशीर कारवाई करण्याची सक्त सूचना केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, स्थानिक नागरिक आणि कंपनी यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणताही व्यवसाय करताना स्थानिकांना त्रास होणार नाही याची कंपनीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. संबंधित व्यवसायासाठी लागू असलेल्या नियमांचेही काटेकोरपणे पालन अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी पोल्ट्री फार्मच्या स्थलांतरासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 6 महिन्याची मुदत देण्याची मागणी केली. इतका वेळ देण्यास स्थानिक लोक तयार नसल्यामुळे नियमांचे पालन सक्तीचे करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार, पशु संगोपन आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने पुढची पावले उचलावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केले.
याप्रसंगी तहसीलदार प्रकाश गायकवाड, पशु संगोपन खात्याचे डॉ. ए. एस. कुडगी, ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. आय. आर. घाडी, ग्रा.पं. सदस्य सखुबाई पाटील, दीपक कवठणकर, भैरू पाटील, अप्पू शिंदे, वाघू पाटील, सुरेश दंडगल, प्रकाश मादार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्त सूचनेमुळे कौलापूरवाडा रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.