Thursday, January 2, 2025

/

बळ्ळारी नालाग्रस्त शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळ्ळारी नाला शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

वारंवार निवेदने देऊनही प्रशासन, सरकार आणि महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असून आज जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने पुन्हा नाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली.

बळ्ळारी नाला आणि नाला परिसरात झालेल्या विकासकामांचा नकाशा यावेळी पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. यापूर्वी महामार्गाची रुंदी कमी होती. परंतु काही वर्षात झालेल्या विकासकामादरम्यान महामार्गाची उंची वाढवण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. बेळगाव शहरातील गटारी, सांडपाणी या नाल्यातून वाहते. त्यामुळे सर्वाधिक पाण्याचा ओढा बळ्ळारी नाल्याला येऊन मिळत असून पाण्याचा निचरा न झाल्याने हे सांडपाणी शेतजमिनीत शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या भागात साचलेल्या पाण्यामुळे या परिसराला एखाद्या जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले असून गेल्या २० वर्षांपासून या नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक निवेदने सादर करण्यात आली.Satish jarkiholi

बळ्ळारी नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन नाल्याच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला असूनही कामासाठी दिरंगाई का होत आहे? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पाण्याचा निचरा नाल्यातून योग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक त्या उपपयोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येत्या आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले असून या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करून बळ्ळारी नाल्यासंदर्भातील समस्यांवर विस्तृत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत, विनोद चौगुले, काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.