बेळगाव लाईव्ह : दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन नाल्यात वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या त्या युवकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने पाच लाखांची मदत दिली आहे.
सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते राज्य सरकारने बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील मयताच्या कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून सदर मदत निधी देण्यात आला आहे. यावेळी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर देखील उपस्थित होत्या.
दोनच दिवसापूर्वी शनिवारी रात्री मार्कंडेय नदी जवळील नाल्यात पडून वाहून गेल्याने ओमकार पाटील वय 24 वर्षे रा. अलतगा या युवकाचा मृत्यू झाला होता. सध्या पावसाचा जोर असल्याने जिल्ह्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मार्कंडेय नदीला देखील पूर आला आहे मयत युवक हा श्रावण मासानिमित्त कटिंग करून घेण्यासाठी म्हणून आपल्या चुलत भावासोबत अलतग्याहून कंग्राळी खुर्द येथे दुचाकीवरून जात होता त्यावेळी अचानक दुचाकी नाल्यात कोसळल्याने तो वाहून गेला होता.
सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोकाक आणि अथणी चिकोडीचा पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता सायंकाळी ते बेळगाव विमानतळावर आले असता मुख्यमंत्र्यांनी सदर मयत युवकाच्या कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश सुपूर्त केला.