बेळगाव लाईव्ह:सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ साहित्यिक प्रा. कृष्णात खोत (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पंचवीस हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.
सदर साहित्य पुरस्कार आचार्य अत्रे जयंतीदिनी मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ५-०० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, गोवावेस, बेळगाव येथे आयोजित केलेल्या वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
याआधी ‘पानीपत’ कार विश्वास पाटील (मुंबई), श्री. अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), श्री. उत्तम कांबळे (नाशिक), कॉ. कृष्णा मेणसे (बेळगाव), डॉ. सदानंद मोरे (पुणे), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई),
श्री. सतीश काळसेकर (मुंबई), श्री. कुमार केतकर (मुंबई), श्री. विष्णू सूर्या वाघ (गोवा), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ. राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रवींद्र (मुंबई), श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), श्री. महादेव मोरे (निपाणी) व अॅड. रमाकांत खलप (गोवा) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.