Wednesday, January 15, 2025

/

श्रमदानाने ‘यांनी’ खडी हटवून रस्ता केला सुरक्षित!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाजवळ अशोक आयर्न वर्क्स समोर रस्त्यावर पडलेली अपघाताला निमंत्रण देणारी धोकादायक खडी श्रमदानाने हटवून रस्ता स्वच्छ सुरक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम आज मंगळवारी सकाळी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे राबविण्यात आला.

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाजवळ अशोक आयर्न वर्क्स समोरील जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यापैकी खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर मधील ओव्हरलोड खडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडत असते.

अशोक यांना वर्क्स समोर रस्त्यावर पडलेल्या या खडीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खडीचा अंदाज न आल्यामुळे विशेष करून रात्रीच्या वेळी या ठिकाणी दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडत होते. अशाच एका अपघातात जवळच्या गावातील एक महिला नुकतीच गंभीरित्या जखमी झाली आहे.

याची दखल घेत यंग बेळगाव फाउंडेशनने आज मंगळवारी सकाळी स्वयंस्फूर्तीने अशोक आयर्न वर्क्स समोरील रस्ता श्रमदानाने स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनच्या सदस्य स्वयंसेवकांनी रस्त्यावरील धोकादायक खडी हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.Road clean

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांनी खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन खात्याने (आरटीओ) तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. ओव्हरलोड ट्रकमुळे इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी आणि दंडाची गरज असल्याचे मतही मोरे यांनी व्यक्त केले.

श्रमदानाने रस्ता स्वच्छ करण्याच्या आजच्या उपक्रमात मृणाल कलमानी, संदीप सोमनत्ती, आदित्य गावडे, नितीन कोटारी, लकी सोलंकी आणि ध्रुव हांजी या स्वयंसेवकांचा समावेश होता. त्यांच्या या जलद आणि निःस्वार्थ उपक्रमाचे त्यांना स्थानिक रहिवाशांमध्ये कौतुक आणि प्रशंसा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.