बेळगाव लाईव्ह:पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ, तसेच तेथे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, या मागणीसाठी उन्नती ट्रस्टच्या नेतृत्वाखाली आज शहरात आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होत असलेल्या अन्याय -अत्याचाराच्या निषेधार्थ उन्नती ट्रस्टच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलावर्गाने हातात निषेधाचे फलक धरून आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडले.
यावेळी पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधाच्या तसेच महिलांना न्याय मिळावा या मागणीच्या घोषणा देत आंदोलनकर्त्या महिलांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आल्यानंतर सर्व महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना आंदोलनाच्या प्रमुखांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आज महिला सुरक्षित नाहीत तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते गुंड घराघरात घुसून महिलांना बाहेर खेचून भर रस्त्यात मारहाण करतात. हे होत असताना लोक मात्र बघ्याची भूमिका घेतात.
काहीच करत नाहीत याच्या निषेधार्थ तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा आणि महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही देशभरातील सर्व महिला आज प्रत्येक जिल्हा केंद्रातून रस्त्यावर उतरलो आहोत. बेळगावमध्ये उन्नती ट्रस्टच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनात विविध महिला मंडळे, महिला भजनी मंडळं वगैरेंचा सहभाग आहे आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पश्चिम बंगालमधील महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तेथील सरकार बरखास्त करून सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी करणार आहोत.