बेळगाव लाईव्ह :गेल्या आठवड्याभरापासून संततधार पडणाऱ्या पावसाने आपले स्वरूप बदलले असून काल मंगळवारपासून शहर परिसरात ऊन -पावसाचा खेळ सुरू झाला आहे. तथापि काल मंगळवारी बेळगाव तालुक्यात सर्वाधिक 27.8 मि.मी. पाऊस राकसकोप परिसरात नोंदविला गेला. त्यामुळे राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 2470.70 फुटावर पोचली होती.
गेल्या आठवड्या बाळापासून शहर आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जुना पी.बी. रोड, अनगोळ, शहापूर, वडगाव वगैरे परिसरातील सखल भागात पाणी साचून राहिले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून तीन दिवस संततधार पावसाची हजेरी असणार आहे. पावसामुळे शहरातील प्रमुख मार्ग वगळता अंतर्गत भागातील बऱ्याच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे झाली आहे.
चिखलाने माखलेल्या या रस्त्यांवर पडलेल्या खाचखळग्यांमध्ये गढूळ पाण्याची डबकी निर्माण झाली आहे. परिणामी पादचारी आणि दुचाकी स्वारांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. बेळगाव शहरांमध्ये काल मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 9 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यात काल झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.
बेळगाव शहर 9 मि.मी., देसूर 25.6 मि.मी., राकसकोप 27.8 मि.मी., संतीबस्तवाड 26.5 मि.मी., उचगाव 7.7 मि.मी., सुळेभावी 3.0 मि.मी., सांबरा 3.8 मि.मी., बागेवाडी 12.6 मि.मी., काकती 5.0 मि.मी., सौंदत्ती 14.0 मि.मी., खानापूर 28.2 मि.मी., नागरगाळी 18.6 मि.मी., बिडी 17.6 मि.मी., कक्केरी 8.4 मि.मी., असोगा 30 मि.मी., गुंजी 35.8 मि.मी., लोंढा 40 मि.मी., जांबोटी 29.2 मि.मी..
दरम्यान, संततधार पाऊस सुरू असल्यामुळे राकसकोप जलाशयाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून काल मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जलाशयाची पाणी पातळी 2470.70 फूट इतकी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ही पाणी पातळी 19 फुटाने जादा असून राकसकोप जलाशय तुडुंब भरण्यासाठी अजून केवळ 4 फूट पाण्याची गरज आहे.
हिडकल जलाशयाची पाणी पातळी देखील वाढली असून सध्या या जलाशयात 15,601 क्युसेक्स पाण्याची आवक आणि 367 क्युसेक्स विसर्ग होत आहे. गतवर्षी 46 वर्षानंतर पहिल्यांदा आषाढी एकादशीला या जलाशयाच्या पात्रातील श्री विठ्ठल मंदिर उघडे पडले होते, जे यंदा पाण्यात बुडाले आहे.
सध्या या मंदिराच्या केवळ कळसाचे दर्शन होत आहे. मलप्रभा नदीवरील नविलुतीर्थ जलाशयाच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून सध्या या जलाशयात 5,865 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून 194 पाण्याचा नदीत विसर्ग होत आहे.