Wednesday, November 20, 2024

/

मुसळधार पावसामुळे गोकाक धबधबा प्रवाहित

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कालपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसामुळे गोकाकचा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाला आहे. गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवर असणारा हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी हि नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने नदीचे पाणी गोकाक धबधब्यात मिसळत आहे. यामुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

सध्या वर्षा पर्यटनाला बहर आला असून बेळगाव जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हा धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा, हिरण्यकेशी नदी प्रवाहित झाली असून गोकाक धबधब्यालाही पाणी आले आहे. कोकण भागात पावसाचा जोर वाढल्याने बेळगावातील घटप्रभा नदीच्या प्रवाहात देखील वाढ झाली असून या नदीवर असणारा गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे.Gokak falls

पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते. गोकाक धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले आता धबधब्याच्या ठिकाणी वळत असून हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पर्यटकांची धडपड सुरु झाली आहे.

मात्र सेल्फी व फोटो काढण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून सेल्फीच्या मोहापायी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे धबधबा आणि अशा निसर्गरम्य पर्यटन स्थळी नागरिकांनी जागरूक राहून पर्यटनाचा आनंद लुटणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.