बेळगाव लाईव्ह:बेळगाव लाईव्ह : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ येत्या 18 जुलै रोजी आयोजिण्यात आला आहे अशी माहिती व्हीटीयूचे कुलपती डॉ. एस विद्याशंकर यांनी दिली.
आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुरुवार दि. 18 जुलै रोजी विश्वेश्वरय्या विश्व विद्यालय ज्ञान संगम प्रांगणातील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात हा समारंभ होणार असून या समारंभाच्या अध्यक्षपदी राज्यपाल थावरचंद गहलोत हे असतील. तसेच उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर, भारतीय विज्ञान मंदिराचे संचालक गोविंदन रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी चिक्कबल्लापूर येथील श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे संस्थापक मधुसूदन साई, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ आणि बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक हरी के मुरारी यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.
याचप्रमाणे दीक्षांत समारंभात बीई-बीटेक विभागातील ५११२९ विद्यार्थ्यांना, बी-प्लॅन विभागातील ८, बी-आर्च विभागातील ११३८ आणि संशोधन विभागातील ३४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचप्रमाणे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार आहे.
परीक्षेच्या तीन तासांत परीक्षेचा निकाल देणारे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. त्याच पद्धतीने आणखी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य सुकर व्हावे, यासाठी सुमारे पन्नास अमेरिकन कंपन्यांना कॅम्पसमध्ये आणण्यास सांगितले जात असून अनेक कंपन्यांशी करारही करण्यात आले आहेत, एकूणच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे ध्येय असून, त्यादृष्टीने विद्यापीठात आणखी अनेक मोठे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कुलपती डॉ. एस. विद्याशंकर म्हणाले.
पत्रकार परिषदेत प्रा.टी.एस.श्रीनिवास, प्रा.बी.ई. रंगास्वामी उपस्थित होते.