बेळगाव लाईव्ह:वडगाव भागात तसेच येथील शेतशिवारांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपद्रवी कुत्र्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होण्याबरोबरच परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून महापालिकेने या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वडगाव भागात तसेच शेतशिवारात बेवारस भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवारातील पार्ट्या आणि कुत्र्यांच्या विणीचा हंगाम याला कारणीभूत असून त्यामुळे शेतकरी महिलांना जीव मुठीत धरून भांगलण व शेतीची इतर कामे करावी लागत आहेत. कारण ही भटकी कुत्री खायला मिळाले नाही तर कळपाने एकटी महिला पाहून चक्क झडप घालण्यास मागेपुढे पहात नाहीत अशी तक्रार आहे. वडगाव भागात ही बेवारस भटकी कुत्री भर रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांच्या कधी आडवी येऊन अपघात होईल सांगता येत नाही. या पद्धतीने अनेकांना अपघातग्रस्त होऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले आहेत.
येळ्ळूर रोडवर शेतकरी आपल्या वाहनावरुन मोठ्या संख्येने चाऱ्याचे भारे किंवा घरच्या महिलानां घेऊन ये -जा करत असतात. तसेच इतर जनतेचाही या रस्त्यावर मोठ्या राबता असतो. गेल्या दोन-चार दिवसात कारभार गल्ली ते आनंदनगर पर्यंतच्या भागात अनेक दुचाकीस्वार भटकी कुत्री आडवी आल्याने जखमी झाले आहेत.
या पद्धतीने भटके कुत्रे आडवे आल्यामुळे काल शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास स्वतः शेतकरी नेते राजू मरवे सपत्नीक दुचाकीवरून पडून जखमी झाले. अपघातात मुका मार बसण्याबरोबरच दोघेही जखमी तर झालेच शिवाय त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.
तेंव्हा एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वडगाव परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या उपद्रवाकडे लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या कुत्र्यांचा युद्धपातळीवर बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.