बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीनंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात अनेकवेळा अशापद्धतीने अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एकाच पोलीस स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मात्र रखडल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस हवालदारांची सामान्य बदली देखील झाली नाही. दोन वर्षांपूर्वी आयुक्तालयातील पोलीस हवालदारांची सामान्य बदली झाली होती. सामान्यत: एका हवालदाराने जास्तीत जास्त पाच वर्षे एकाच पदावर काम केले पाहिजे असा नियम होता.
मात्र प्रत्येक ठाण्यात सुमारे 7 ते 8 वर्षांपासून काही हवालदार तैनात असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील मार्केट पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, उद्यमबाग पोलीस ठाणे, कॅम्प पोलीस ठाणे, खडेबाजार पोलीस ठाणे, माळमारुती पोलीस ठाणे, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे, मारिहाळ पोलीस ठाणे, हिरे बागेवाडी पोलीस ठाणे, काकती पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यात १३४९ कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
तर 1000 हुन अधिक कर्मचारी कनिष्ठ पदावर सेवा बजावत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात सुमारे 7-8 वर्षांपासून एकच कॉन्स्टेबल तैनात आहेत. या सर्वांची सामान्य बदली होणे गरजेचे होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शहरातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका यासारख्या बेकायदेशीर गोष्टींना पेव फुटले आहे. काही अपवाद वगळता अशा गोष्टींना आळा घालण्यात संबंधित स्थानकांचे निरीक्षक व कर्मचारी अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. शहरात विविध ठिकाणी घडणाऱ्या बेकायदेशीर कृतींकडे पोलिस डोळेझाक का करत आहेत? विविध धाबे, हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीर रित्या होत असलेली मद्यविक्री, पोलिसांसमोरच अनेक ठिकाणी होत असलेली अवैध दारू विक्री यासारख्या अनेक बेकायदेशीर कामांना आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी सामान्य बदली प्रक्रिया राबवून पोलीस प्रशासन अधिक चपखल केले होते. त्यानंतर बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेल्या एस.एन. सिद्धरामप्पा यांनी मात्र बदली प्रक्रियेची तसदी घेतली नाही.
अलीकडेच पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांची बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आपल्या कारकिर्दीत सुप्त पडलेल्या पोलीस प्रशासनावर आपली छाप उमटवतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासन सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.