बेळगाव लाईव्ह : पोलीस कर्मचाऱ्यांविषयी अनेक व्हिडीओ अलीकडच्या काळात सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
कधी पोलिसी खाक्या दाखवणारे पोलीस तर कधी दंडात्मक कारवाई करण्यासाठी आडवळणावर उभं राहणारे पोलीस तर कधी वेळप्रसंगी माणुसकीचं दर्शन घडविणारे पोलीस.
काल बेळगाव शहरातदेखील अशाच पद्धतीची एक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून आर एल एस महाविद्यालयानजीक असलेल्या गटारीवरील मॅनहोलमध्ये अडकलेल्या वृद्ध व्यक्तीचा जीव या भागात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी वाचविला आहे.
मुसळधार पावसामुळे सध्या गटारी, नाले तुडुंब भरून वाहात असून आरएलएस महाविद्यालयानजीकच्या गटारीची अस्वथादेखील अशीच झाली होती. याठिकाणी असलेल्या मॅनहोल मध्ये एका वृद्ध व्यक्तीचा पाय अडकला होता.
हि बाब निदर्शनात येताच दक्षिण वाहतूक पीएस कॉन्स्टेबल सिकंदर आणि सदाशिव यांनी वृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसभर फिरत असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कार्याला जनता सॅल्यूट करत आहे.