बेळगाव लाईव्ह :रहदारी पोलिसांनी शहरातील वनखात्याच्या कार्यालया समोरील रस्त्याच्या फूटपाथ वरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम आज बुधवारी सकाळी हाती घेतल्यामुळे पादचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील वनखात्याच्या कार्यालयासमोरील मध्यवर्ती बस स्थानक आणि आरटीओ सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवर चहा व पानपट्टीच्या टपऱ्यांसह इतर किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले होते.
सदर रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात रहदारी असते. फूटपाथ वरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होऊन त्यांना रस्त्यावरील रहदारीतून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत होते.
यामुळे सुरळीत वाहतुकीवर देखील परिणाम होऊन अपघाताचा धोका वाढला होता याची गांभीर्याने दखल घेत रहदारी पोलिसांनी आज बुधवारी सकाळी अचानक सदर रस्त्याच्या फुटपाथ वरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
त्यामुळे टपरी चालक आणि अन्य विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांच्यापैकी काहींनी जाब विचारला असता पोलिसांनी त्यांना कायद्याच्या चौकटीत सर्व काही केले जात असल्याचे सांगून आपली मोहीम सुरूच ठेवली होती.
या पद्धतीने फूटपाथ वरील अतिक्रमणे हटविण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांमध्ये मात्र समाधान व्यक्त होत होते.