बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया आज मंगळवारी सकाळी महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडली.
महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी सकाळी प्रत्येक स्थायी समितीची स्वतंत्र बैठक होऊन या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सत्ताधारी गटाकडून चारही स्थायी समितीचे अध्यक्षांची नावे यापूर्वीच निश्चित करण्यात आली असल्यामुळे आजची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केवळ एक औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आली.
महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांचे नूतन अध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत. लेखा स्थायी समिती : नगरसेविका रेश्मा बसवराज कामकर, नगर रचना आणि नगर विकास स्थायी समिती : नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समिती : नगरसेवक श्रीशैल शिवाजी कांबळे, कर व फायनान्स अपील स्थायी समिती : नगरसेविका नेत्रावती भागवत.
सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या बेळगाव महापालिकेत उपमहापौर आनंद चव्हाण वगळता सर्व महत्वाची पदे कन्नड भाषिकांकडे आहेत.
महापौर सविता कांबळे या कन्नड भाषिक आहेत. त्यानंतर आता सत्ताधारी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी देखील कन्नड भाषिक नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. हे पाहता महापालिकेतील मराठी भाषिकांचे वर्चस्व कमी होत आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी गटात मराठी भाषिकांचा बोलबाला असायचा. मात्र आता सत्ताधारी गटात मराठी भाषिक नगरसेवक बहुसंख्येने असून देखील प्रमुख पदांच्या बाबतीत त्यांना डावलले जात असल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे