बेळगाव लाईव्ह :सध्या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्याकरिता जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी वायव्य परिवहन महामंडळ बेळगाव विभागाकडून आज 13 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीत बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक येथून दर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी, प्रत्येक रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हायस्पीड विशेष बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅमचे पर्यटन घडविण्यासाठी वायव्य परिवहन मंडळाकडून यंदा ही पावसाळी विशेष पर्यटन बस सुरू करण्यात आली आहे. आज शनिवारी सकाळी या सेवेचा शुभारंभ झाला आहे. पर्यटकांसाठी ही एक प्रकारची सुवर्णसंधी ठरली आहे.
येत्या 25 ऑगस्टपर्यंत दर दुसरा व चौथा शनिवार, प्रत्येक रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही विशेष बस सोडली जाणार आहे. बेळगाव, हिडकल धरण, (डॅम), गोडचिनमलकी आणि गोकाक धबधबा या मार्गावर ये-जा करण्यासाठी या बसची सोय करण्यात आली आहे.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी 9 वाजता निघणारी ही विशेष बस हिडकल डॅम येथे सकाळी 10 वाजता पोहोचेल. या ठिकाणी पर्यटकांसाठी एक तास ही बस थांबणार असून सकाळी 11 वाजता तेथून सुटून गोडचिनमलकी येथे 11:30 वाजता पोहोचेल.
या ठिकाणी सुमारे दीड तास बस थांबेल तेथून दुपारी 1 वाजता सुटणारी ही बस 1:30 वाजता गोकाक फॉल्स येथे पोहोचेल. या ठिकाणी सुमारे अडीच तास ही बस थांबणार आहे. त्यानंतर पर्यटकांना घेऊन ही बस पुन्हा दुपारी 4 वाजता बेळगावकडे मार्गस्थ होईल आणि सायंकाळी 6 वाजता परत बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर पोहोचेल.
या पॅकेजमध्ये प्रति प्रवासी 190 रुपये राउंड ट्रिप भाडे आहे. हे विशेष परिवहन पॅकेज असल्याने महिला प्रवाशांना शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास करण्याची परवानगी नाही. या विशेष बस सेवेसाठी आगाऊ तिकीट बुकिंगची व्यवस्था आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक पर्यवेक्षक दूरध्वनी: 7760991612, 7760991613 किंवा बेळगाव युनिट व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनी : 7760991625 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे कळविण्यात आले आहे.