बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावातील शिवमुर्तीच्या समोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले आहे असा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनी केला आहे.
अनेक वर्षापासून हे काम असंच रखडलंय याच मुख्य रस्त्यावरून 20 पेक्षा जास्त गावांचा संपर्क जोडला गेला आहे पण या रखडलेल्या कामामुळे प्रत्येकाला या खड्ड्यांना सामोरे जावं लागत आहे. निवडणूक येताच याच शिवमुर्तीला हार अर्पण करून कंग्राळी खुर्द गावामध्ये हे लोकप्रतिनिधी प्रचाराला सुरुवात करत असतात पण निवडणूक होताच या शिवमुर्तीच्या आजूबाजूच्या परिसराचा विसर मात्र नक्की पडतो कंग्राळी खुर्द हा मराठी बहुल भाग असल्याकारणाने वेळोवेळी दुर्लक्षितच केलं जातं आहे का असा सवाल देखील पाटील यांनी या निमित्ताने केला आहे.
गावचा विकास होईल या आशेवर विद्यमान आमदारांना कंग्राळी खुर्द गावातून भरभरून मते देण्यात आली होती. तसेच आताच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदार यांना सुद्धा जास्तीत जास्त मतदान हे गावातून झालं होतं. तरी देखील या दोन्ही प्रतिनिधींनी या कामाकडे पाठ फिरविली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच रस्त्यावरून यमकनमर्डी मतदार संघात वजा करण्यासाठी फिरत असतात शिवमुर्तीच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे काम अनेकदा निवेदन देऊन सुद्धा असेच रखडले आहे.
पण मागील काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायती कडून वॉर्डनिहाय विकासासाठी जो 18 लाखांचा निधी आला होता तो सर्व निधी ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने त्या नाल्याच्या कामासाठी दिला व नाल्याचे काम पूर्ण करून घेतले. तसेच वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून येथील परिसरात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पार पाडले होते. पण काही कालांतराने जैसे ती परिस्थिती उद्भवत आहे यासाठी कायमस्वरूपी रस्त्याची कॉंक्रिटीकरण करणं गरजेचं आहे.आता हे तरी काम मराठी मतांच्या जोरावर निवडून आलेले आमदार व खासदार करतील हीच मापक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.