Sunday, November 10, 2024

/

खानापूरमधील समस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे :

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरापाठोपाठ तालुक्यातील असुविधांनी डोके वर काढले असून वर्षानुवर्षे विकासाच्या दिशेने आवासून पाहणाऱ्या खानापूरवासियांनी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन केले आहे.

खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरुन गोव्याला जाणारी अवजड व इतर वाहतुक गेल्या आठ वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हा रस्ता पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे. जागोजागी या रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेडेगाळी ते हारुरी आणि मणतुर्गे रेल्वेगेट ते मणतुर्गे क्रॉस संपुर्णपणे खड्डेमय झालेला आहे. यामुळे या भागातील या रस्त्यावरून दळण-वळणासाठी दुचाकीवरुन जाता-येताना पन्नास खेड्यातील जनतेचे मोठे हाल होत आहेत. हा रस्ता नव्याने करावा यासाठी माननिय तहसिलदार साहेब यांच्या मार्फत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना व शासन दरबारी अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही, म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २२ ऑगस्ट २०२२ रोजी खानापूरचे तत्कालीन तहसिलदार प्रविण जैन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता हलगी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर ११ डिसेंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता, खानापूरचे विद्यमान तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आजतागायत या रस्त्याचे काम झालेले नाही. यासारखे मोठे दुर्दैव नाही, असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

खानापूर-रामनगर गोवा हा रस्ता नव्याने करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद केलेला होता, यामुळे गोव्याला जाणारी वाहतुक खानापूर-हेम्माडगा व्हाया अनमोड मार्गे आठ वर्षापासून सुरु आहे. हा रस्ता अरुंद तसेच जंगलातून जात असल्यामुळे हलक्या वाहतुकीसाठी या ५० गावातील जनतेसाठी करण्यात आलेला आहे, परंतू अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने गोव्याला जाणारी अवजड वाहतुक या रस्त्यावरुन चालुच आहे. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे उखडून गेला असून या भागातील ५० गांवच्या लोकांना रस्ताच नाहीसा झाला आहे.

या रस्त्यावरुन साधी दुचाकीही चालविणे कठीण झाले आहे. वारंवार छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरुच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंत्या करुनही कोणतीच दखल घेतली नसल्याने हा रस्ता नाईलाजाने लोक जीव मुठीत घेऊन आपल्या दुचाकीवरुन प्रवास करत आहेत. तरी हा रस्ता लवकरात लवकर नव्याने करणे व अवजड वाहतुक त्वरीत बंद करावी. तसेच हालात्री नदीवरील पुल उंचीने कमी आहे, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुर्णपणे बंद होऊन ५० खेड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. यासाठी हा पुलाची उंची वाढवून नव्याने बांधावा अशी या भागातील लोकांची मागणी आहे.

त्याचप्रमाणे हा रस्ता पूर्णपणे अरुंद असुन सदरी रस्त्यावरून अवजड वाहतुक करण्यासाठी बंदी असुनही या रस्त्यावर बिनधास्तपणे वाहतुक सुरूच आहे. यासंदर्भात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना देऊन तत्काळ अवजड वाहतुक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.Khanapur logo

यासह खानापूर-असोगा-मणतुर्गे या रस्त्याचीही चाळण झाली आहे. तसेच गर्लगुंजी ते इदलहोंड या रस्त्याची देखील चाळण झाली आहे. तसेच लालवाडी-चापगाव-अवरोळी आणि हलशी-हलगा-मेरडा-नागरगाळी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

यासाठी ११ डिसेंबर २०२३ रोजी रास्तारोकोचा इशारा देण्यात आला होता. परंतु खानापूरच्या तत्कालीन तहसिलदारांनी रस्ता बांधण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती. मात्र यावेळी आपण या पाचही रस्त्यांची पाहणी करावी व दळणवळणाची सोय करून द्यावी. अन्यथा खानापूर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ व म ए समितीचे पदाधिकारी व सदस्य येत्या ५ ऑगस्ट रोजी राजा शिवछत्रपती चौक येथे रास्तारोको आंदोलन छेडणार असून होणार्‍या परिणामांना शासनच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.