बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटीच्या समस्यांचा पाढा संपता संपेनासा झाला आहे. वाढता वाढता वाढे.. अशा पद्धतीने दिवसागणिक स्मार्ट सिटीच्या समस्यांमुळे नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरु असून यामुळे बेळगाव स्मार्ट सिटीची दुर्दशा प्रसारमाध्यमांवर, सोशल मीडियावर झळकत आहे. ठिकठिकाणी असलेले नाले, गटारी तुडुंब भरून यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे. निवासी भागासह व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरून अनेकांचे नुकसान होत आहे. प्रत्येक वर्षी हि समस्या उद्भवते, प्रशासनाचे पाहणी दौरे होतात, आश्वासनांची खैरात केली जाते. परंतु प्रत्येक वर्षी या समस्या जैसे थे परिस्थितीच राहतात आणि याचा फटका नागरिकांना सोसावा लागतो.
२०१९ साली झालेल्या पावसात नागरिकांची अक्षरशः दैना उडाली. यावेळी लोकप्रतिनिधींसह प्रशासन देखील खडबडून जागे झाले. तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यासाठी नियोजन देखील केले गेले. परंतु ‘पुन्हा.. ये रे माझ्या मागल्या’ हा प्रकार दिसून येत असून शहरातील गटारीत, नाल्यातील कचरा, गाळ न काढल्याने पुन्हा यावर्षी सांडपाणी रस्त्यावरून वाहून, घराघरात, दुकानात शिरत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांवर आजवर अनेकवेळा ताशेरे ओढण्यात आले. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे हि अशास्त्रीयपद्धतीने झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. परंतु तरीही बेळगावला स्मार्ट सिटी साठी दोन वेळा पुरस्कार मिळाला, हा विरोधाभासच म्हणावा लागेल. बेळगावचा विकास व्हावा यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे करण्यात आली.
मास्टर प्लॅन राबविण्यात आले. यासाठी नागरिकांच्या कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातूनच सरकारने निधी उपलब्ध करून दिला. परंतु या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.
शहरातील रुपाली टॉकीज, फोर्ट रोड, माणिकबाग यासह विविध ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आजवर नागरिक निवेदने देऊन प्रशासनाकडे विनंत्या करत होते. मात्र आता समाजमाध्यमांचा माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारांवर प्रकाश टाकून प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यात येत आहे. परंतु तरीही प्रशासन कुंभकर्णाच्या गाढ झोपेतच निद्रिस्त असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
सध्या पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता प्रशासन कचऱ्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याचे जाणवत आहे. शहरात प्लास्टिक बंदी करण्यात येऊनही गटारी, नाल्यात आढळून येणार प्लास्टिकचा कचरा कुठून येत आहे? प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ बातम्यांपुरती आणि उपक्रमांपुरतीच मर्यादित आहे का? असा प्रश्न जागरूक नागरीकातून उपस्थित केला जात आहे.
एकंदर शहराची परिस्थिती पाहता हि स्मार्ट सिटी आहे कि आणखी काय? असा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता प्रशासनाने शहरातील या समस्या गांभीर्याने सोडविण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.