बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे सुरु करण्यात आल्यापासून बेळगावचा विकास भकास होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पैशांच्या अपव्यय, भ्रष्टाचाराचा सातत्याने होणार आरोप, निकृष्ट दर्जाची कामे, नागरिकांचे होणारे प्रचंड हाल आणि याउलट अशी अवस्था असूनही स्मार्ट सिटीला मिळालेला पुरस्कार! या गोष्टींचा ताळमेळ जुळून येत नाही, हेच आजवर दिसून आले आहे.
एकीकडे कोट्यवधींचा निधी स्मार्ट सिटीच्या कामकाजासाठी उपलब्ध करून दिला जातो तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून जनतेला मात्र गैरसोयींनशिवाय काहीच मिळत नाही, हे आजवर सिद्ध झाले आहे. आता याचाही कहर म्हणजे स्मार्ट सिटीसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयातून गटारी निर्मितीसाठी स्मार्ट सिटी विभागाकडे पैसे नसल्याची माहिती उघड झाली आहे…!
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव महापालिका व्याप्तितील पाइपलाइन रोड विजयनगर येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान ग्रामीण आमदार यांनी कामाचा शुभारंभ केला. कामाला सुरुवात केली. पण आजतागायत हे कामकाज पूर्ण झाले नाही. पाइपलाइन रोडची अत्यंत दुरावस्था झाली होती.
यामुळे मागील वर्षी रस्त्यावर पेव्हर्स आणि दुतर्फा गटारी करण्यात आल्या. उर्वरित रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केले गेले. यात देखील सुरवातीला पाईप लाईन रोड ची सुरुवात असणाऱ्या मारुती मंदिर येथून शेवट बाची रोड पर्यंत करण्याचे आश्वासन दिले गेले., पण फक्त ४०० मीटर रस्ता करण्यात आला असून उर्वरित रस्त्याचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्याचे कारण देण्यात येत आहे.
याउलट जेथे रस्ता बनविला जात आहे त्या ठिकाणी जुन्या आणि सुस्थितीत असणाऱ्या गटारी काढून पुन्हा नवीन बांधण्यात आल्या आहेत. मात्र ज्याठिकाणी गटारीचे नाहीत त्याठिकाणी गटारीचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी आवाज उठविला, जाब विचारला मात्र यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यात आली. आता रस्त्याचे कामकाज पूर्णत्वाकडे येऊनही अद्याप गटारीचे बांधकाम नसल्याचे निदर्शनात आले असून नागरिकांना याविषयी टाळाटाळीची उत्तरे देऊन धुडकावण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात स्मार्ट सिटी अधिकारी सईदा अफ्रिन बानू यांची येथील नागरिकांनी भेट घेतली असता जनतेने पैसा जमा करून दिल्यानंतर गटार बनविण्यात येईल, अशी उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या भागात केवळ १०० मीटर गटारीचे कामकाज करण्यात आले असून या भागातील सांडपाण्याचा निचरा तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नाही. एकंदर पुन्हा एकदा स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाविरोधात जनता मात्र आता चांगलीच संतापली आहे हे नक्की….!