दरवर्षीप्रमाणे यंदाचा श्री गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय बसवेश्वर सर्कल, शहापूर येथील व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
खासबाग येथील देवांग मंगल कार्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दिनेश मेलगे हे होते. व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाला मोठी परंपरा आहे.
मंडळातर्फे येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात विधायक उपक्रमांवर भर देत विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी व व्यापाऱ्यांनी मंडळाच्या उपक्रमांमध्ये अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे मत बैठकीत अध्यक्ष मेलगे यांनी व्यक्त केले. माजी नगरसेवक नेताजी जाधव, कृष्णा हलगेकर आदींनीही आपले समयोचित विचार मांडले.
मंडळाच्या स्थापनेपासून विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला असल्यामुळे ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात यावी असे मत सर्वांनी व्यक्त केले.
बैठकीस विनोद कोळीवाड, रमेश शेठ, माजी अध्यक्ष शिवाजी पवार, सुनील कलाल, महेश शिंदे, अनिल शिंदे, बंडू बामणे, अभिषेक हलगी, विजय हलगी, राकेश हुलमणी, मयूर गर्लहोसुर, महेश नाईक, श्रीधर महेंद्रकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.