बेळगाव लाईव्ह : स्पीड ब्रेकर बसवून हलगा बेळगाव सर्विस रोडची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना देऊ आणि रस्त्याची पाहणी करू अशी ठोस आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
शनिवारी सकाळी एडवोकेट अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार वकील आणि हलगा ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हालगा -बेळगाव सर्व्हिस रोडवरील धोकादायक खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बसवण्याच्या माध्यमातून तात्काळ सुरक्षा उपाय हाती घेण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे हालगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हालगा येथील कामगार, महिला व ग्रामस्थांच्यावतीने आज शनिवारी सकाळी ॲड. अण्णासाहेब घोरपडे व अन्य वकिलांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बस्तवाड हालगा ते बेळगाव सर्व्हिस रोडवरील अपघात टाळण्यासाठी येथील मंजुनाथ राईस मिल व होल्कास वॉगन कार शोरूम समोर स्पीड ब्रेकर व सिग्नलसह इतर व्यवस्था कराव्यात. त्याचप्रमाणे महालक्ष्मी रोडलाईन्स वर्कशॉप समोर पडलेले मोठे खड्डे त्वरित बुजवावेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्यात यावेत.
कारण सदर रस्त्यावरून दररोज बस्तवाड, हालगा कोंडसकोप्प आदी गावातील हजारो कामगार, शेतकरी व ग्रामस्थ हे दैनंदिन कामासाठी बेळगावला ये -जा करत असतात. तथापि वरील ठिकाणी स्पीडब्रेकर व सिग्नल नसल्यामुळे तसेच रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. या संदर्भात आपण जातीने लक्ष देऊन त्वरित उपाय योजनेसाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. एखादा शेतकरी कामगार अपघातामुळे अपंग झाला अथवा मयत झाला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन उध्वस्त होते. यासाठी आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्यासह ॲड. मोहन नंदी, ॲड. शरद देसाई, ॲड. एस. के. कांबळे, ॲड. आर. एन. नलवडे, ॲड. गणेश भावीकट्टी, ॲड. महादेव शहापूरकर, ॲड. चंद्रकांत काकडे, मनोहर संताजी, सदानंद बिळगोजी, कृष्णा चौगुले, बाबुराव जाधव आदी गावकरी उपस्थित होते.