बेळगाव लाईव्ह : आज सकाळपासून पावसाने जरी उसंत घेतली असली आणि सकाळच्या सत्रात जरी थोडीशी उघडीप जाणवली असली तरीही दुपारनंतर पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला असून रामदुर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यातील अंगणवाडी केंद्रे, शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक – माध्यमिक शाळांना तसेच पदवीपुर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू असेल.
गेल्या पाच दिवसांपासून शाळा – महाविद्यालयांना पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता शनिवारी देखील सुट्टी जाहीर केल्याने हा संपूर्ण आठवडा पावसामुळे सुट्टीत गेला आहे.
अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरीही या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग देखील सुरू केले आहेत.
तसेच शालेय व्हाट्सअप ग्रुप वर अभ्यासक्रमा संदर्भात सूचना देखील देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशात सुट्टीची भरपाई येत्या काही दिवसात करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
यामुळे पुढील काही दिवसात शनिवारी अर्ध्या दिवसाच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल करून पूर्ण दिवस आणि रविवारी देखील शाळा भरविण्याची शक्यता आहे.