बेळगाव लाईव्ह : “भविष्यात कोणत्या संधी आहेत त्याची चाचणी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपल्या पाल्याचा कल कोणत्या बाजूला आहे, त्याच्यात कोणते कौशल्य आहे ,याचा विचार करून पालकांनी आपल्या मुलांचे करिअर घडवावे. त्यामुळे मुले अधिक यशस्वी होऊ शकतील “असे विचार कोल्हापूरचे निवृत्त प्राध्यापक पी ए धोंगडे यांनी बोलताना व्यक्त केले.
बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगाव शहर आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मराठी माध्यमात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
यंदा हा कार्यक्रम गेल्या रविवारी शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. त्यावेळी समारंभाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत हे होते तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून पी ए धोंगडे हे उपस्थित होते.
प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन धोगंडे सरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक गोविंदराव राऊत यांनी केले. आपल्या भाषणात घोंगडे सरांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.” शाहू महाराजांनी वेगवेगळ्या समाजासाठी कोल्हापुरात 23 वेगवेगळी वसतिगृह सुरू केली त्यातून हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडले व आज जगात सर्वत्र यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहेत.
त्यांचाच एक विद्यार्थी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली” असे ते म्हणाले .
याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले .याप्रसंगी धोंगडे यांच्या व वाचनालयाच्या संचालकांचे हस्ते बेळगाव शहरातील 16 आणि बेळगाव तालुक्यातील 26 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सदस्य अनंत लाड यांनी केले तर सहकार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी वाचनालयाच्या चिटणीस लता पाटील, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी , वाचनालयाचे संचालक यांच्यासह शहराच्या विविध भागातील मान्यवर उपस्थित होते.