बेळगाव लाईव्ह : बेळगाव-पणजी महामार्ग, खानापूर अंतर्गत असलेल्या मार्गावरील, नगरपंचायतीच्या जॅकवेलनजीक असलेल्या मलप्रभा नदीवरील ब्रिजचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे मोडकळीस आले असून यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मलप्रभा नदीवर असणाऱ्या ब्रिजचे सिमेंटचे कठडे तुटून पडले असून यामधील लोखंडी गजदेखील गायब झाले आहेत. हा पूल अशापद्धतीने मोडकळीस आला आहे,
कि ज्यामुळे याठिकाणावरून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जाण्याची वेळ आली आहे. सदर पुल अरुंद असून, एकाचवेळी दोन्ही बाजूने चारचाकी किंवा अवजड वाहने आल्यास अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पूल अरुंद असल्याने दुहेरी वाहतुकीदरम्यान दुचाकीस्वार, सायकलस्वारांना हि बाब धोकादायक बनली आहे. हि परिस्थिती आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची अशीच दुरावस्था झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर यांनी पुढाकार घेत या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे कोसळल्याने धोका असल्याचे सूचनाफलक उभे केले होते.
तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्ट्या बांधून नागरिकांना सतर्क केले होते. मात्र आता पावसाला सुरुवात झाली असून पुन्हा या कठड्यांची अवस्था धोकादायक बनली आहे.
हि बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग यासह स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.