बेळगाव लाईव्ह :देखभाली अभावी गेल्या कांही महिन्यांपासून गळती लागलेल्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील चार नळांची निरपेक्ष वृत्तीने दुरुस्ती करण्याच्या स्वरूपात एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केल्याबद्दल अर्बन केअर होम सर्व्हिस वडगावचे यल्लाप्पा बसरीकट्टी यांची प्रशंसा होत आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीतील चार नळ गेल्या कांही महिन्यांपासून गळत होते. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. सदर बाब वारंवार निदर्शनास येताच नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी स्मशानभूमीच्या देखभालीकडे सरकारच्या दुर्लक्षावर प्रकाश टाकत पाण्याचे महत्व विशद केले होते.
त्याचप्रमाणे स्मशानभूमीतील नळांच्या दुरुस्तीची गरज व्यक्त करताना अशा समस्या सोडविण्यासाठी समाजातील सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मोरे यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत प्लंबिंगच्या कामात कुशल असलेल्या यल्लाप्पा बसरीकट्टी यांनी गंगाधर पाटील व मित्रांच्या सहकार्याने नळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण केले. कोणतीही अपेक्षा न करता त्यांनी हे काम केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी यल्लाप्पा बसरीकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुविधांमधील छोट्या पण अत्यावश्यक समस्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तसेच सदाशिवनगर स्मशानभूमी सारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक जागांच्या देखभालीकडे प्रशासनाने गांभीर्याने सत्वर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.