Wednesday, January 1, 2025

/

बेळगावचा सुसाईड ब्रिज! तिसऱ्या गेटच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी बेळगावमधील तिसऱ्या रेल्वे गेटनजीकच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले. मात्र या उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या पहिल्याच आठवड्यात दिसून आलेल्या खड्ड्यांनी उड्डाणपुलाच्या दर्जाचे वाभाडे काढले.

तब्बल चार वर्षे या उड्डाणपुलाचे कामकाज सुरु होते. चार वर्षानंतर तातडीने या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे काम हाती घेण्यात आले. ऑक्टोबर २०२२ मध्ये या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो समाजमाध्यमावर वायरल झाले. उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस आजतागायत पडतच आहे.

उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या या उड्डाणपुलावर आजतागायत अनेकवेळा अपघात घडले आहेत. उड्डाणपुलाचे निकृष्ट दर्जाचे कामकाज उड्डाणपुलाच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचे अधोरेखित करत असून सध्या या पुलावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही सोशल मीडियावर झळकत आहे.Rob third gate

अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली एकंदर वाहतूक यासाठी शहरात उभारण्यात आलेले उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीपेक्षा समस्यांचेच कारण बनले आहे. तिसऱ्या रेल्वे गेटनजीक उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात घडला. काही सुजाण नागरिकांनी या उड्डाणपुलाच्या कामाचे वाभाडे काढत उड्डाणपुलावर पडलेले खड्डे, बंद अवस्थेत असणाऱ्या पथदीपांमुळे उड्डाणपुलावर पसरलेला अंधार, खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने होत असलेले अपघात या सर्व गोष्टींवरून प्रशासन, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि अभियंत्यांना सवाल उपस्थित केला असून या उड्डाणपुलाच्या कामकाजासंदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

आजतागायत या उड्डाणपुलावर असंख्य अपघातांची नोंद झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे शहरातील विकासकामांचे पितळ उघडे पडले असून नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर पुलावरून वाहतूक करण्यास मनाई करण्यात यावी, आणि तातडीने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.