बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियंत्रणात यावी यासाठी शहरात विविध ठिकाणी ओव्हर ब्रिज निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या ओव्हर ब्रिज मुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडली असून उड्डाणपुलांच्या समस्या देखील वाढत आहेत.
काही उड्डाणपुलाची अवस्था उद्घाटनाच्या काही दिवसातच चव्हाट्यावर आली असून पथदीप, खड्डे यासह अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. सध्या कपिलेश्वर उड्डाणपुलाची अवस्थाही दयनीय झाली असून या पुलावर साचलेल्या पाण्यामुळे पुलाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
उड्डाणपुलाचे फोटो सोशल मीडियावर नागरिकांनी वायरल केले असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ताशेरेही ओढले आहेत.
या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी आता नागरिकांना रेनकोट, छत्री, गमबूट ची गरज असून या उड्डाणपुलाचे ‘हिडन डॅम’ असे नामकरणही करण्यात आले आहे. शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विकासकामे तर निकृष्ट दर्जाची आहेत हे आधीच सिद्ध झाले आहे.
मात्र आता उड्डाणपुलांचीही अवस्था ज्या पद्धतीने बिकट झाली आहे त्यावरून मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर करण्यात आला आहे कि यात देखील मोठा घोटाळा झाला आहे? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.