बेळगाव लाईव्ह :सध्याच्या पावसामुळे मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एक जुनी सार्वजनिक विहीर खचून अचानक कोसळल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील कोसळलेली ही विहीर जुनी ब्रिटिश कालीन चार गडगड्यांची होती. दगडी बांधकामाच्या या विहिरीमुळे परिसरातील रहिवाशांची भर उन्हाळ्यातही पाण्याची चांगली सोय होत होती.
सध्याच्या पावसामुळे आज सकाळी सदर विहीर अचानक कोसळली. विहिरीचे मजबूत बांधकाम संपूर्णपणे कोसळल्यामुळे आता विहिरीला लागून असलेली इमारत व घरांच्या भिंतींना धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी विहीर कोसळल्याची व शेजारी घरांना धोका निर्माण झाल्याची माहिती प्रभाग क्र. 15 चे स्थानिक नगरसेवकांना महापालिकेला दिली आहे.
घटनास्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना मंगळवार पेठ येथील रहिवासी सुनील मुतकेकर यांनी या ठिकाणची महापालिकेची चार गडगड्यांची जुनी विहीर आज सकाळी कोसळली आहे.
सदर विहीर कोसळल्यामुळे शेजारील घरे व इमारतीच्या भिंतीना धोका निर्माण झाला आहे असे सांगितले तसेच याकडे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे कोसळलेल्या विहिरी संदर्भात आम्ही नगरसेवकाना य माहिती दिली आहे. मात्र ते अद्याप चौकशी करण्यासाठी या ठिकाणी फिरकले नसल्याचेही मुतकेकर यांनी स्पष्ट केले.